Blog

अंनिसच्या ३७व्या वर्धापन दिनी विवेक, विज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर ठाणे शहर शाखेच्या कार्यक्रमात राजन राजे व कुमार केतकर प्रमुख वक्ते; लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त महा. अंनिस – ठाणे शहर शाखेच्या वतीने रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित विशेष कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे तसेच ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात १५व्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाचे सातारा येथील नवनिर्वाचित अध्यक्ष व लोकशाहीर साथी संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक चळवळीच्या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी साहित्य, कला, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन यांचा परस्परांशी असलेला संबंध यावरही विचारमंथन झाले.
मा. राजन राजे यांच्या भाषणातील महत्त्वपूर्ण विचार —
“ज्ञान-विद्वत्ता, व्यासंग आणि अनुभवसिद्धता…याचा अर्थाअर्थी ‘आकलनशक्ति’शी थेट सबंध असतोच असं नाही! आकलन, ही काव्यप्रतिभेसारखी किंवा अन्य तर्हेच्या प्रतिभेच्या आविष्कारासारखी जन्मसिद्ध असते का…ते तुमच्या DNA मध्येच वसलेलं असतं का; नक्की समीकरण मांडणं, तसं कठीण आहे…पण, ‘आकलन’ म्हणजे, एरव्ही आपण समजतो तसं इंग्रजीत Assessment नव्हे; तर, Comprehension होय. जगण्याच्या प्रश्नांची यशस्वीरित्या सोडवणूक करण्यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक! समज, समजूतदारपणा, व्यवहारज्ञान, परिस्थितीचं भान आणि ज्ञान…हे त्याच्या जवळपास जाणारे अर्थ. समस्यांचं मुळातून आकलन झाल्याखेरीज त्यातून सुटकेचा मार्ग कसा समजणार?
कार्ल मार्क्स, म. गांधी हे राजकारण-समाजकारणाच्या दृष्टीकोनातून…गौतम बुद्धांपासून सुरुवात केली की, आपली संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम, तुकडोजीमहाराज, गाडगेबाबा ही सगळी आध्यात्मिक अंगाने आणि शिवछत्रपती महाराज, पं. नेहरु, डाॅ . बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही दृष्टीकोनातून अत्युच्च दर्जाचं ‘आकलन’ असलेली, सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेली मंडळी!
बाबासाहेबांनी काळाची पावलं अचूक ओळखून आपल्या जमातीला “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”, असा अमोघ संदेश दिला!
स्वातंत्र्य-चळवळ उभारताना….बहुजनांना, महिलांना, वंचित वर्गाला समाविष्ट करुन घेतलं आणि जशी आजच्या -जेन-झी’ने जुलमी सत्ताधाऱ्यांबाबतची जनतेच्या मनातील भिती नष्ट केली; हे त्यांच्या उत्तुंग आकलनाचेच दर्शन होय.
कार्ल मार्क्स, अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिपादन करुन गेला, “The philosophers have only interpreted the world, in various ways; the point is to change it.” तेव्हा, मला कधि कधि वाटतं की, लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत असंच अवचित कधि उठून कार्ल मार्क्सने, आमच्या पोरसवदा वयाच्या ‘संभाजी भगत’च्या डोक्यावर हात ठेवला असेल आणि त्यातूनच, ‘शाहीर संभाजी भगत’ घडला असणार…कारण, हाच “जग बदलण्याचा” विचार तहहयात त्यांचा पिच्छा पुरवतोय!
पण, कार्ल मार्क्स फक्त, जाणिवेच्या पातळीवर काम करत होता; तर, गौतम बुद्ध, म. गांधी जाणिवा आणि नेणिवा अशा दोन्ही पातळ्यांवर काम करु पहात होते आणि तोच मार्ग शाहीर संभाजी भगतांनी अनुसरलेला दिसतो. सांस्कृतिक-कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या ‘जाणिवा आणि नेणिवा’ विकसित केल्याखेरीज कल्याणकारी ‘शाश्वत-परिवर्तन’ होणार नाही; ही त्यांची ठाम असलेली धारणा, अगदी योग्यच होय!
माझी तशी त्यांच्याशी ओळख अलिकडचीच…साधारण वर्षभरापूर्वी निवर्तलेले, कामगार-चळवळीचे आधारस्तंभ, काॅ. संजय संघवींचे, यांचे ते जिगरी दोस्त…हे ही आम्हाला अलीकडेच समजलेलं! बायबलमध्ये म्हटलंय… “By their fruit you will recognize them…Do people pick grapes from thornbushes, or figs from thistles?” अगदी तसंच, “त्यांच्या कृती आणि त्यांच्या अस्तित्वाचे भवतीच्या समाजावर झालेले परिणाम” पाहिल्यानंतर…अगदी थोडक्या परिचयात, मी त्यांच्या एकूण व्यक्तित्वाचा धांडोळा घेऊ शकलो, ते माझ्यासाठी, एकूणच समाजासाठी व कामगार-चळवळीसाठी खूपच महत्त्वाचं आहे.
शाहीर संभाजी भगतांच्या हातून समाजात कल्याणकारी परिवर्तन होवो आणि त्याकामी आमचं ‘योगदान’ खर्ची पडो…हीच, साताऱ्याच्या ‘विद्रोही साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदी’ निवड झाल्याबद्दलच्या सत्कार-समारंभाप्रसंगी आमची मनोकामना, धन्यवाद… ॥ जय महाराष्ट्र, जय हिंद ॥”
अंधश्रद्धेच्या अंधारातून विवेकाच्या प्रकाशाकडे, अज्ञानातून विज्ञानाकडे आणि अन्यायातून समता-न्यायाच्या दिशेने समाजाला घेऊन जाण्याचा हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाची उपस्थिती; राजन राजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले संविधान अभिवादन

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोर्ट नाका, अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर भारतीय जनतेने स्वतःला अर्पण केलेले भारतीय संविधान हेच आपल्या लोकशाहीचे खरे अधिष्ठान आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये अबाधित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीशिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपकरी कामगारांच्या लढ्याला कामगार ऐक्याची भक्कम साथ!

मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगार गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. आपल्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला आता विविध उद्योगांतील कष्टकरी कामगारांकडूनही भक्कम पाठिंबा मिळत आहे.

धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न रायगड, तळोजा येथील जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगार सदस्यांनी अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या संघर्षाप्रती एकजूट व्यक्त केली. यावेळी संपकरी कामगारांना रु. २२,५००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.

विशेष म्हणजे, जॉन्सन मॅथे कंपनीतील कामगारांनीदेखील चार वर्षांपूर्वी आपल्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संघर्षानंतर व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेतून एक त्रैवार्षिक वेतन करारदेखील संपन्न झाला. त्यामुळे अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या कामगारांच्या सध्याच्या संघर्षातील वेदना आणि त्यांची लढ्याची गरज जॉन्सन मॅथेतील कामगारांनीही जवळून अनुभवलेली आहे.

ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, “एक उद्योगातील कामगारांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी दुसऱ्या उद्योगातील कामगार ठामपणे उभे आहेत,” या संघटित कामगार चळवळीच्या ऐक्याची आणि बंधुभावाची जिवंत प्रचिती आहे.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचा ठाम आणि सक्रिय पाठिंबा आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन चर्चेच्या माध्यमातून लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना आपला संघर्ष पुढे नेण्यासाठी निश्चितच बळ मिळाले आहे. विविध उद्योगांतील कामगारांनी एकमेकांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच संघटित कामगार शक्तीचे खरे सामर्थ्य आहे.

कामगार एकजुटीचा विजय असो!

गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आशीर्वादासाठी कार्यकर्त्यांची ठाणे कार्यालयात मांदियाळी; न्याय, पर्यावरण व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटित संघर्षाचा निर्धार!

भारतातील पहिलावहिला पर्यावरणस्नेही हरित पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला धर्मराज्य पक्ष आणि कष्टकऱ्यांची लढाऊ संघटना धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ यांचे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, आज बुधवार, दि. २९ जुलै-२०२६ रोजी पक्षाच्या ठाणे येथील कार्यालयात निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
आपल्या गुरूप्रती असलेली निष्ठा, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांचा ओघ सुरू होता. प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत मा. राजन राजे यांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले.
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कामगार सदस्यांच्या या प्रेमाने, ‘कामगारहृदयसम्राट’ अशी ओळख असणाऱ्या मा. राजन राजे यांचे हृदयदेखील भारावून गेले होते.
यावेळी मा. राजन राजे यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्था, अन्यायकारक व धनदांडग्या भांडवलदारी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणे, हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
कामगार आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, तेच देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचेही आधारस्तंभ आहेत, याची जाणीव करून देत त्यांनी संघटित शक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी आपल्या मार्गदर्शकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, कामगार सदस्य व हितचिंतकांचे मा. राजन राजे यांनी मनःपूर्वक आभार मानले आणि न्याय, पर्यावरण, कामगार व शेतकरी हिताच्या लढ्यात अधिक जोमाने कार्य करण्याचा संदेश दिला.

भिवंडीतील ‘सिम्प्रेस इंडिया’मध्ये “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा आणखी एक उल्लेखनीय करार!

वाशेरे (भिवंडी) येथील मेसर्स सिम्प्रेस इंडिया प्रा. लि. या डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील कंपनीत, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही धर्मराज्य पक्षप्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघातर्फे कामगारांच्या पगारवाढीचा करार यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या करारानुसार, कंपनीतील ३५ कायम कामगारांना सरासरी रु. १२,९५८ (सुमारे रु. १३,०००) थेट पगारवाढ मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून केवळ ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून व्यवसाय करत, तोट्यातून हळूहळू नफ्याकडे वाटचाल करणाऱ्या कंपनीत अशा स्वरूपाचा करार होणे ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. करारानुसार दुसऱ्या वर्षापासून पगारवाढीपैकी ६० टक्के रक्कम बेसिक वेतनात व ४० टक्के रक्कम अलाउन्समध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
याशिवाय, कामगारांना दरवर्षी ६ अतिरिक्त सशुल्क सुट्ट्या, दरवर्षी ३ गणवेश, तसेच कामगार व त्यांच्या पालकांचा मेडिक्लेम प्रीमियम कंपनीतर्फे भरण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत ५ ते ६ कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात कायम होणारे व संघटनेचे सभासद बनणारे कामगारही या करारातील सर्व लाभांसाठी पात्र असतील.
अत्यंत आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही कामगारहित जपत झालेल्या या करारामुळे सिम्प्रेस इंडिया कंपनीतील कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांनी मा. राजन राजे व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे आभार व्यक्त केले आहेत.

रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्रीच्या संपाला १०० दिवस पूर्ण; एलजी हिंग व प्रोटेगोच्या कामगारांकडून संपकऱ्यांना प्रत्येकी ₹२५ हजारांची आर्थिक मदत!

मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या बेमुदत संपाला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त, धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाशी संलग्न एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई येथील कामगार सदस्यांनी संपकरी कामगारांना एलजी हिंग, मुंबई व प्रोटेगो, नवी मुंबई युनिटकडून प्रत्येकी रु. २५,०००/- चा धनादेश प्रदान करून आर्थिक मदत केली. या प्रसंगी न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संपाला संघटित कामगार चळवळीचा ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे संपकरी कामगारांना संघर्ष पुढे नेण्यासाठी बळ मिळाले असून, विविध उद्योगांतील कामगारांनी दाखविलेल्या ऐक्यभावनेचे हे उल्लेखनीय उदाहरण ठरले.

दिल्लीतील जंतर-मंतर जनआंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चा ठाम पाठिंबा!

आज धर्मराज्य पक्षासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तसेच विविध सामाजिक, कामगार, विद्यार्थी व राजकीय संघटनांच्या संयुक्त वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण झालेल्या संकटाबाबत, तसेच लेह-लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री. राजन राजे म्हणाले, “लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मार्ग दडपशाही नव्हे, तर संवाद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असो किंवा पर्यावरण संरक्षणाचा विषय असो, केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी तात्काळ चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे.”
धर्मराज्य पक्षाचा स्पष्ट विश्वास आहे की, विद्यार्थ्यांना न्याय, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन ही कोणत्याही सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे. आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष न करता केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची ठाम भूमिका आहे.
या निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), धर्मराज्य पक्ष, कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शप), जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), भारत जोडो अभियान, श्रमिक जनता संघ, आयटक, बहुजन विकास संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कायद्याने वागा लोकचळवळ, अन्न अधिकार अभियान, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन, गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समिती तसेच अंगणवाडी व आशा वर्कर संघ यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पुणे येथील सुल्झर इंडिया कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राजन राजे यांची सदिच्छा भेट; कामगार हक्कांसाठी संघटनात्मक बळकटीचा संकल्प!

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीजवळील कोंढापुरी येथील सुल्झर इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तसेच सुल्झर इंडिया कामगार युनियनचे मार्गदर्शक मा. राजन राजे यांची युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर धुमाळ, सेक्रेटरी स्वप्नील शेळके, कार्याध्यक्ष किरण दरेकर, उपाध्यक्ष प्रशांत माने, खजिनदार प्रवीण शेळके, मिलिंद पिंगळे, मंगेश गायकवाड, अजय निळकंठ तसेच इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीदरम्यान कामगारांच्या विविध प्रश्नांवर, संघटनेच्या आगामी वाटचालीवर, कामगार हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर तसेच संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित प्रयत्न अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
धर्मराज्य पक्ष प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ व सुल्झर इंडिया कामगार युनियन यांच्या माध्यमातून कामगार हितासाठीची लढाई अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प!

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रश्मीता पोपेटा यांच्या आमरण उपोषणास ‘धर्मराज्य पक्षा’चा जाहीर पाठिंबा!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते स्व. दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे, या न्याय्य आणि जनभावनांशी निगडित मागणीसाठी समाजसेविका रश्मीता पोपेटा यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सचिव नरेंद्र पंडित यांनी पक्षाचे समर्थनपत्र आंदोलनस्थळी सुपूर्द केले. तसेच ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते समीर चव्हाण, कामोठे येथील धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी महेंद्र म्हात्रे, विजय म्हात्रे, बाबुराव भगत व इतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनास नैतिक व वैचारिक पाठिंबा व्यक्त केला.
‘धर्मराज्य पक्षा’ची सुरुवातीपासूनच ठाम भूमिका आहे की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे. हा केवळ नामकरणाचा विषय नसून भूमिपुत्रांच्या संघर्ष, त्याग आणि अस्मितेचा सन्मान आहे.
शासनाने जनभावनांचा आदर राखून ही न्याय्य मागणी तात्काळ मान्य करावी, अशी ‘धर्मराज्य पक्षा’ची आग्रही मागणी आहे.

रोहा येथील अंशुल इनोव्हेटिव्ह कंपनीतील संपाला ७३ दिवस पूर्ण; धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाकडून संपकरी कामगारांना आर्थिक मदत

रोहा (जि. रायगड) : मे. अंशुल इनोव्हेटिव्ह केमिस्ट्री प्रा. लि. येथील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आदरणीय राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बेमुदत संपाला आज ७३ दिवस पूर्ण झाले. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष कामगारांच्या एकजुटीने आणि निर्धाराने सुरू असून, या पार्श्वभूमीवर “धर्मराज्य पक्ष” प्रणित धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या वतीने संपकरी कामगारांना आर्थिक व नैतिक पाठिंबा देण्यात आला.

संपकरी कामगारांना संघर्षकाळात आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने महासंघाच्या वतीने प्रत्येक संपकरी कामगारास ₹१०,००० ची आर्थिक मदत धनादेशाच्या स्वरूपात प्रदान करण्यात आली. ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, संपूर्ण धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न विविध युनिटमधील कामगार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, खजिनदार अजित सावंत, सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे, निरंजन म्हात्रे, जगन्नाथ सलगर, महेश पवार तसेच विविध युनिटमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॉलमेट फ्लो कंट्रोल युनिटमधील कमलेश कोल्हे, अविनाश बडे, लोटन येलवे, निलेश घरत, दिनेश पाटील यांच्यासह हिवा इंडिया नितीन भुरे, विनोद गायकवाड, दिपक जाधव, हेमंत कदम, इडिकॉनचे राजेश कदम, राकेश म्हात्रे आणि अन्य कंपन्यांतील कमिटी सदस्यांनीही उपस्थिती लावली.

कार्यक्रमादरम्यान विविध युनिटमधील पदाधिकाऱ्यांनी व कामगार प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. सुल्झर पंप युनिटचे सरचिटणीस विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात, “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ केवळ कामगारांचा पगार वाढवण्यासाठीच कार्य करत नाही, तर प्रत्येक कामगाराने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगावे यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे,” असे मत व्यक्त केले.

यावेळी महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, करार झालेल्या कामगारांकडून संघटनेकडे जमा होणारे निधीचे स्रोत हे केवळ कामगारांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच वापरले जातात. संपकरी कामगारांना देण्यात आलेली आर्थिक मदत हे त्याचेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अंशुल इनोव्हेटिव्हमधील संघर्ष हा केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कामगार चळवळीशी संबंधित असल्याने महासंघाच्या सर्व युनिट्सनी संपकरी कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपस्थित सदस्यांनी संपकरी कामगारांनी गेल्या ७३ दिवसांत दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि एकजूट यांचे कौतुक केले. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन लवकरच समाधानकारक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपकरी कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्परांशी संवाद साधत संघर्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.

“मा. राजन राजे (भाई) यांचे मार्गदर्शन, त्यांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव, विषयांचा सखोल अभ्यास आणि कामगार चळवळीप्रती असलेली निष्ठावान बांधिलकी यांमुळे या संघर्षाला योग्य दिशा व बळ मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या दृढ विश्वासाच्या बळावर कामगार आपले न्याय्य ध्येय निश्चितपणे साध्य करतील, याबाबत कोणतीही शंका नाही.”

दरम्यान, संबंधित मागण्यांवर न्याय्य तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका संपकरी कामगारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. संघर्ष कितीही काळ चालला तरी अंतिम विजय कामगारांचाच होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!