Blog

दुष्काळग्रस्तांसाठी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे मदत फेरी

, , ,

दि. २४ मार्च-२०१३ रोजी ठाणे शहरात, सकाळी ९:०० वा.पासून ते दुपारी १:०० वा.पासून आणि संध्याकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ७:०० वा.पर्यंत, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून, गहू-तांदुळ, ज्वारी-बाजरी, डाळ इ. धान्याच्या स्वरुपात आपण मदत करु शकता. “पैशाच्या स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.” (नागरिकांनी पैशाच्या स्वरुपातील मदत, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मदतनिधी योजनांच्या माध्यमातून करावी.) “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया… ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असं नव्हे; तर, आता दुष्काळी समयी, ‘थेंबे थेंबे तळे वाचे’, असं म्हणावयास हवे !!!“
…यासाठी शहरवासीयांनी अंघोळीसाठी, सोसायटीमधील जिने धुण्यासाठी, बाग-बगिच्यांसाठी व गाड्या धुण्यासाठी कमीतकमी पाण्याचा वापर करावा, दुष्काळाच्या गांभीर्याबाबत सर्वांना जागरुक करावे व आपल्या दुष्काळी बंधू-भगिनींप्रति सहसंवेदना प्रकट करावी, असे नम्र आवाहनही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे, आम्ही ठाणेकर नागरिकांना करीत आहोत !!!

मदतरुपानं जमा झालेल्या पाच प्रकारच्या धान्यांचं वाटप, तीव्र दुष्काळी भागात (उदा. समनगांव-जालना, कोल्हेवाडी-केज इ.) ‘आम आदमी पक्षा’च्या सौ. अंजली दमानिया, ठाण्यातील प्रख्यात समाजसेवक सर्वश्री नितीन देशपांडे व ‘धर्मराज्य पक्षा’चे संघटक तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सरचिटणीस श्री. विक्रांत कर्णिक यांच्या देखरेखीखाली केले जाईल, याची कृपया नोंद घ्या!

धर्मराज्य पक्ष स्थापना…

, ,

दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली.

बुधवार, दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी ‘धर्मराज्य’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष-राजन राजे, सरचिटणीस-राजू फणसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपाल दुखंडे, माजी न्यायमूर्ती/जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बी.जी.कोळसेपाटील, ‘अर्थक्रांती’ प्रतिष्ठानचे अध्वर्यु श्री. यमाजी मालकर, पक्षाचे खजिनदार श्री. जयेंद्र जोग, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याजवळ दिप-प्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

उपस्थित मान्यवर आणि जनता जनार्दनाच्या साक्षीने पक्षाचा नामफलक, मुद्रा आणि झेंड्याचे अनावरण करून ‘धर्मराज्य पक्षा’ची मुहूर्तमेढ रोवली. नंतर ‘धर्मराज्य पक्षा’चे ब्रीद असलेली प्रतिज्ञा उद्धृत करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस श्री. राजू फणसे यांनी सुमारे ६५ कार्यकर्त्यांना नियुक्ती-पत्र देऊन त्यांच्या प्राथमिक नेमणूका झाल्याचे घोषित केले. नियुक्ती-पत्र मिळालेल्या सर्व पदाधिकार्यांना प्रा.गोपाल दुखंडे यांनी शपथ दिली. पक्षाच्या उदघाटन सोहळ्यामद्धे महापुरुषांचे पुतळे न ठेवता हुतात्म्यांचा पुतळा ठेवण्यामागील पक्षाची भूमिका सरचिटणीस राजू फणसे यांनी स्पष्ट केली व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.

याबाबतचे विवेचन केले. प्रा.गोपाळ दुखंडे यांनी आपल्या भाषणात सध्याची राजकीय परिस्थिती, राजकीय पक्ष व त्यांचे नेते यावर कडक ताशेरे ओढले. तसेच धर्मराज्य पक्षाकडून जनतेची खूप अपेक्षा आहे असे सांगून पक्षाच्या वाटचालीला आशीर्वाद दिले.

१% राजकीय व आर्थिक शासकवर्गानं ९९% बहुसंख्यांकांवर लादलेलं ‘पारतंत्र्य’… लादलेली गुलामगिरी मोडून काढून खऱ्याखुऱ्या ‘सामाजिक लोकशाही’तल्या कल्याणकारी स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर राजकीय संस्कृतिची नव्यानं उभारणी करणाऱ्या एका जाज्वल्य राजकीय पक्षाची स्थापना होणं… नव्या सकस-जातिवंत राजकीय रोपटयाच रोपण होणं, ही काळाची गरज बनली होत़ी !

‘जशी उक्ति तशी कृती’ या न्यायाने ‘धर्मराज्य पक्ष’ चालणार असून त्याच्या नावातच सारंरूपाने तो नैसर्गिक तत्वाच्या मुल्यांवर आधारीत असा पक्ष आहे. पक्षाच्या ध्वजाच्या रंगांमधील लाल रंग हा क्रांतीदर्शी, तर पांढरा रंग हा सप्तरंगांनी बनलेला म्हणून सर्वसमावेशक व उर्जावान, हिरवा रंग निसर्गाशी तादात्म्य दाखविणारा तर निळा रंग हा महासागराची व आभाळाची विशालता व गांभीर्य दाखविणारा तर भगवा रंग हा चैतन्याशी व आध्यात्म्याशी निगडीत असणारा आहे. झेंडयाच्या मध्यभागी असणारे भगव्या रंगाचे चक्र हे श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे प्रतिक असून ‘धर्मराज्य पक्षा’चा तात्विक पाया (धार्मिक नव्हे!) हा युगंधर श्रीकृष्णाच्या कळीकाळाला व्यापून उरणाऱ्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे, हे दर्शविते. कुठल्याही राज्यव्यवस्थेचं, मानवी आकांक्षांचा सन्मान राखणं हे मुख्य काम असतं. गेले शतकभर भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद (कम्युनिझम्) हा सामान्य माणसाच्या हितरक्षणासाठी स्वीकारलेल्या दोन विचार-प्रणालींचा संघर्ष चालू आहे. सामान्य माणूस संपला – उध्वस्त झाला. हा संघर्ष आजही संपलेला नाही. म्हणून जणू मानवी मर्कटलिलांवर संतप्त होत निसर्गाने आपला तिसरा डोळा उघडून येत्या काही दशकात हा संघर्ष मिटवायला घेतल्याची दु:चिन्हे आहेत. मानव जातीपुढे जागतिक तापमान वाढ, जैविक बहुविधतेचा ऱ्हास व रासायनिक प्रदूषण अशी महाभयंकर पर्यावरणीय संकटे उभी ठाकलेली आहेत. टोकाचे मानवी शोषण व निसर्गाचे शोषण याबाबत दुरदर्शीपणे ठाम व कठोर भूमिका घेण्याची तयारी व राजकीय इच्छाशक्ती भारतातील राजकीय पक्ष दाखवत नसल्याने हि जबाबदारी ‘धर्मराज्य पक्ष’ स्वीकारीत आहे.

अण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल’ विधेयकाला आणि श्री अनिल बोकिलांच्या ‘अर्थक्रांती’ संकल्पनेला पूर्ण पाठींबा, औद्योगिक सेवाक्षेत्रातील अस्पृश्यता व गुलामगिरी बनलेल्या मजूर-कंत्राटदारी पद्धतीचं समुळ उच्चाटन व विध्वंसक अणूऊर्जेला विरोध तसेच शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमधील बेलगाम खाजगी करणाला तीव्र विरोध हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत.परिपूर्ण संघराज्यीय पद्धतीनुसार ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. महाराष्ट्र’ या तत्वावर सर्वच राज्यांना जास्तीत जास्त स्वायतत्ता देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी असेल.

इयत्ता सातवीतील पालक व चिमुकल्या मित्र-मैत्रिणिंना संदेश

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

’भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ’मूळांचा दळभार’ आणि ’पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ’उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ’आधार’ आहे अन् दुर्जनांवर ’प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात बाळगूनही मराठी संस्कृति-विकृति, मराठी अस्मिता-दुहीता, मराठी शौर्य-क्रौर्य, मराठी ज्ञान-अज्ञान, मराठी धीर-तर कुठे मागं फिर, अशा गुणा-दुर्गुणांनी भरलेला आणि भारलेला मराठमोळा माणूस आणि त्याची मायबोली मराठी – हे माझं पहिलं प्रेम! छोटया स्तरावर सामाजिक कार्य करताना का होईना, पण आपल्या क्षमतेची प्रत्यंचा पूर्ण ताणत, त्या मराठमोळया माणसासाठी आणि ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेसाठी, त्यातल्या ’जवापाडे’ असणा-या दुर्गुणांना दाबून ’पर्वताएवढे’ असणा-या सद्गुणांना उठाव देत काहीतरी करीत राहणं, हा माझा ध्यास!! आणि म्हणूनच हा पत्र प्रपंच अन् हे तुमच्यासाठी प्रेमानं ’पेन’रूपी भेटवस्तू वाटप.

इयत्ता दहावीतल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, (माझी मुलं तुमच्या वयाची आहेत आणि आपल्या संस्कृतित षोडशवर्षीय मुलं ही आईबाबाची मित्रमैत्रिणी होतात) ’काल’ मी तुमच्या वयाचा होतो आणि ’उद्या’ तुम्ही माझ्या वयाचे असाल – पण या दरम्यानचा हा जो 30-35 वर्षांचा प्रवास असतो ना, तो मित्रांनो फार फार खडतर असतो आणि सद्यस्थितीत तर तो दिवसागणिक निश्चितपणे अधिकाधिक खडतर होत जाणारायं. त्याला तोंड देण्यासाठी आपण स्वत:ला सक्षम बनवायला हवं.

कोण कुठला आपल्याला सहानुभूति दाखवेल – कुठेतरी वशिल्यानं चिकटवेल, या खोटया आशेवर जगू नका. कारण पदरात ’सहानुभूति’ ऐवजी पोळून काढणा-या वास्तवाची ’अनुभूति’ निखा-याच्या स्वरूपात पडण्याची शक्यता अधिक. ’मराठी माध्यमाचे’ म्हणून कोणी आपल्याला ’सवलतीची’ आरक्षित पंगत वाढणार नाहीय, तर या स्पर्धेच्या जगात कर्तृत्व थिटं पडलं तर तोंडाला पानं पुसली जातील किंवा कुठल्याही बेसावध क्षणी भरल्या ताटावरून उठवलं जाईल. माझ्या अल्पस्वल्प सार्वजनिक जीवनातील हे विदारक अनुभव आहेत मित्रांनो, म्हणून उठा! जागे व्हा!! आसन, प्राणायाम-व्यायामानं मन-शरीर बळकट करा आणि भरपूर अभ्यास करा!!! व्हर्नॅक्युलर मिडियमची (देशी भाषेचे माध्यम) मुले म्हणजे ’गाळ’ आहे, या उच्चभ्रू लोकांत सार्वत्रिक पसरलेल्या गैरसमजाला मूठमाती देण्यासाठी स्वत:ला परिश्रमानं सिध्द् करा – सक्षम व्हा आणि आम्ही ’गाळ’ नसून ’गाळाची सुपीक माती’ आहोत, हे जगाला दाखवून द्या!

मित्रांनो, दिवसेंदिवस जगणं किती कठीण होत चाललयं, हे आपण थोडं समजून घेऊया. पूर्वीच्या काळी ’उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी’ म्हटली जायची. पूर्वापार ’धंदा’ म्हटलं म्हंजे मराठी माणसाचा मोठा ’वांधा’! कारण एकतर धंघ्यासाठी लागणा-या कठोर परिश्रमांची पुरेशी तयारी नाही (अलिकडे हे चित्र सुदैवानं हळूहळू का हाईना, पण निश्चितपणे बदलू लागलयं) आणि दुसरीकडे ’धदा’ म्हटलं म्हंजे चलाखी-मखलाशी आणि थोडी बहुत बदमाशी आलीच, पण त्याचाच सचोटीनं जगणा-या मराठी माणसाकडे ’वांधा’, त्यामुळे ढोबळमानानं कुठल्याही धंद्याच्या क्षेत्रात ’मराठी पाऊल’ दुर्दैवानं चार हात मागेच.

मग उरली सुरली ती ’शेती’ (त्यातही आता ’कान्ट्रॅक्ट-फार्मिंग’ येतयं) आणि शिल्लक राहील्या त्या ’नोक-या’! प्रामुख्यानं मराठी माणूस जिथे वळतो, त्या नोकरीच्या संधिंना एकीकडे अतिरेकी यांत्रिकता व सर्वव्यापी संगणकीकरणामुळे ’क्षयाची बाधा’ झालेली, तर दुसरीकडे आर्थिक शोषणाच्या चरकातून पिळून काढणा-या ’कंत्राटी मजुरी’ (Contract Labour) या ऑक्टोपसी-संकल्पनेमुळे परप्रांतियांच्या आक्रमणाची त्यात भर पडलेली! त्याची व्यापकता एवढी भीषण की, तुमच्या गुरूजनांच्या शिक्षकी पेशातदेखील ही ’अवदसा’ दशदिशांनी घुसलीयं. त्यामुळे काळाच्या ओघात आचार्यांचे (जसे द्रोणाचार्य) गुरूजी झाले (जसे सानेगुरूजी), गुरूजींचे ’सर’ झाले (जसे मेहंदळेसर) आणि आता तर कंत्राटी पध्दतीने सरांच ’सरपण’च होतयं की काय, अशी उव्दिग्न अवस्था झालीय. हातात बंदुका-तलवारी न घेता का होईना पण, मराठी लोकांवर झालेले हे ’परप्रांतीय-आक्रमण’च नव्हे तर काय? मित्रांनो, हे काळाचं मोठं कठीण ’संक्रमण’ आहे – रात्र वै-याची आहे, म्हणून जागे राहून ’सक्षम’ बना!

’सक्षम’ व्हायचं म्हंजे नेमकं काय करायचं? सर्वप्रथम जीवनातल्या प्रत्येक बाबतीत (सुरूवात दिनचर्येपासून) स्वावलंबी व्हा! वानगीदाखल एक गोष्ट सांगतो. गाजलेले अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना त्यांच्या स्वत:चा बूटाला पॉलिश करताना पाहून आश्चर्यचकित झालेला त्यांचा सहकारी म्हणाला, “तुमच्या बूटांना तुम्हीच पॉलीश करता, प्रेसिडेट महाशय?” लिंकन उत्तरले, “मग तुम्ही कोणाच्या बूटांना पॉलीश करता?” ’स्वावलंबित्व’ ही व्यक्तिविकासाची पहिली पायरी – पुढे कळसाला हात घालण्यासाठी ब-याच पाय-या ओलांडायच्यायत.

मित्रांनो, जे काही करायचं त्यात स्वत:ला झोकून देऊन त्यात जास्तीत जास्त प्राविण्य संपादन करा, प्रसंगी कुठलही काम करण्यात बिलकुल लाज बाळगू नका, यशापयशाची पर्वा न करता विचापूर्वक प्रयत्नांची कास धरा, मनात सदैव कुणालाही सहकार्य करण्याची भावना बाळगा – व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनात कुणालाही नडणा-या – छळणा-या नकारात्मक भावनेला य:किंचितही थारा देऊ नका – कुणाला मदत करणं जमलं नाही तरी एकवेळ चालेल, पण नाहक कुणालाही अडचणीत आणू नका! ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार विपरीत व अन्यायी परिस्थितीशी जरूर प्रबळ ’संघर्ष’ करायचा, पण ह्रदयातला ’प्रेमाचा स्पर्श’ मात्र नाही हरवू द्यायचा!

टी.व्ही., जाहिराती आणि सिनेमे यातून दिसणारा भुलभुलैय्या, हा वरून कितीही गोंडस दिसला तरी तो अंति निखालस फसवा आणि विनाशाप्रत नेणारा आहे. अशा त-हेचं चंगीभंगी आयुष्य आपल्या वाटयाला येईल, या दिवास्वप्नात रहाल तर भयानक तोंडघशी पडाल आणि कुणी आधाराचा हात द्यायलाही नसेल – वेळ तर आपल्याला केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेलेली असेल!

माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की, कृपाकरून याला माझी ’सिनेस्टाईल लेक्चरबाजी’ समजण्याची घोडचूक करू नका! माझं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर निरतिशय प्रेम आहे, कारण भविष्यात आपली सोन्यासारखी मराठी भाषा आणि संस्कृति तेच जिवंत ठेवणार आहेत! तुमच्यावाचून म-हाटमोळया संस्कृतिच्या निरांजनातलं ’तेल’ संपायला वेळ लागणार नाही. ’पार्कर पेनाच्या भेटवस्तू वाटपाच्या निमित्तानं अक्षरश: जीव तोडून तुमच्या ह्रदयाला मी साद घालतोय, ती तुम्हाला निद्रेतून गदगदा हलवून जागं करण्यासाठी! एवढी एक गोष्ट जरी तुम्ही समजून घेतलीत, तरी मी स्वत:ला धन्य समजेंन.

एस्. एस्. सी. परीक्षा हे मित्रांनो, घराच्या उंबरठयाबाहेर टाकलेलं पहिलंवहिलं पाऊल असतं. पुढे अनेक पाऊलांची ’पायवाट’ लांबवर पसरलीय. म्हणून हे तुमचं ’शुभारंभाचं पाऊल’ यशाच्या दिशेकडे वळावं, हीच माझ्या बालमित्रमैत्रिणींसाठी माझी ईशचरणी प्रार्थना!

।। धन्यवाद ।।

error: Content is protected !!